Delhi Vidhan Sabha Election Result: सगळ्यांचे लक्ष देशाची राजधानी दिल्लीकडे आहे. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तीन वेळा दिल्लीची सत्ता राखलेल्या 'आप'लाच पुन्हा सत्तेची संधी मिळणार की, २७ वर्षांनी भाजपला सत्तेची संधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर दुपारपर्यंत मिळेल. महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्ष दिल्लीत सत्तेत येण्यापूर्वी दिल्लीत राज्य करणाऱ्या काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, याबद्दलही उत्सुकता आहे.
दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर हळूहळू दिल्लीत कोणाची सत्ता हे चित्र स्पष्ट होत जाईल.
एक्झिट पोलचा कौल भाजपला
तिरंगी लढत झालेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल्सनी भाजपची दिल्लीत घरवापसी होण्याचे संकेत देत आहेत. असे झाले तर २७ वर्षांनंतर भाजपची दिल्लीतील सत्तेत घरवापसी होईल.
लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपने आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. पण, याच कालावधीत झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावेळी भाजपने दिल्लीत सर्वस्व पणाला लावल्याचे दिसले. एक्झिट पोलने भाजपची सत्ता येण्याचा कौल दिला आहे.
काँग्रेसचं काय होणार?
अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातून जन्माला आलेल्या आपने दिल्लीतील काँग्रेस सत्तेला सुरूंग लावला. तेव्हापासून काँग्रेसला दिल्लीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या आपसोबत न जाता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केजरीवालांच्या आपला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, यामुळेही या निवडणुकीकडे लक्ष आहे.
केजरीवालांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने चालवले होते सरकार
आपने २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत आपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवालांनी ४९ दिवस सरकार चालवले होते. सलग तीन वेळा आपचे सरकार दिल्लीत राहिले आहे. यावेळी दिल्लीकर केजरीवालांना पुन्हा संधी देणार का आणि आपला किती जागा मिळणार, याबद्दलची उत्कंठा आहे.