Delhi Election Result: काँग्रेसला मोठा धक्का, 63 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 09:28 AM2020-02-12T09:28:50+5:302020-02-12T09:36:43+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही.
नवी दिल्ली : दिल्लीकरांनी विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आम आदमी पार्टीला विजयी केले. या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आठ ठिकाणी विजय मिळाला, तर काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे काँग्रेसला आतापर्यंतचा हा मोठा धक्का बसला आहे. निकालाची आकडेवारी पाहता काँग्रेसला पाच टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात दिल्लीत 15 वर्षे सरकार चालवणाच्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. काँग्रेसचे तीन उमेदवार अरविंद सिंह लवली (गांधीनगर), देवेंद्र यादव (बादली) आणि अभिषेक दत्त (कस्तुरबानगर) यांनी या निवडणुकीत आपले डिपॉझिट वाचविले आहे.
दिल्लीत काँग्रेसने पहिल्यांदाच राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी करत निवडणूक लढविली होती. 66 जागांवर काँग्रेसने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तर चार जागा सहकारी पक्षाला सोडल्या होत्या. जर, निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी 1/6 (16.6%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना डिपॉझिट म्हणून जमा केलेली रक्कम जप्त केली जाते. काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना पाच टक्क्यांहून कमी मते मिळाली असल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
विशेष म्हणजे, दिली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांच्या कन्या शिवानी चोपडा या कालकाजी मतदार संघातून निवडणूक लढवत होत्या. मात्र, त्यांनाही जास्त मते मिळाली नसल्याने त्यांचेही डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांची मुलगी प्रियंका सिंह यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे.
काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद सुद्धा संगमविहार जागांवर निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, त्यांनाही आपले डिपॉझिट वाचविता आले नाही. पूनम आझाद यांना फक्त 2604 मते म्हणजेच 2.23 टक्के मिळाली. बल्लीमरानमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री हारून युसूफ महज यांनाही फक्त 4.73 टक्के मते मिळाली आहेत. निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार पाहता अनेक उमेदवार निवडून येतील अशी अनेकांना आशा होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
Delhi Election : आपच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्याचा मृत्यू
Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी
Delhi Election: विरोधकांना नवचैतन्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा