Delhi Election 2020 : 'आप'ने ६२ जागांसह जिंकली दिल्ली, पण भाजपाला ६३ जागांवर आनंदाची किल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:46 AM2020-02-13T11:46:07+5:302020-02-13T11:48:44+5:30
Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'विरुद्ध भाजपाने 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 2015 च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या पाच जागा वाढल्या आहे
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर आम आदमी पक्षाच्या विजयाचे सेलिब्रेशन आता काही प्रमाणात शांत झाले आहे. 'आप'ने दिल्लीत 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र भाजपासाठी या पराभवात देखील आनंदाची बातमी दडली आहे. एकूण 63 जागांवर भाजपासाठी ही निवडणूक आनंद देणारी ठरली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'विरुद्ध भाजपाने 8 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. 2015 च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या पाच जागा वाढल्या आहे. 2015 मध्ये भाजपाला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी पराभव झाला असला तरी हिंदुत्वावादी भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.
भाजपाची मतांची टक्केवारी वाढली
दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपाने यावेळी मतांच्या टक्केवारीत अनेक मतदार संघांवर मजबूत पकड निर्माण केली आहे. दिल्लीत 70 पैकी 63 जागांवर भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. यापैकी 20 जागांवर 2015 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतं वाढली आहेत. भाजपाची मतांची टक्केवारी नजफगड मतदार सर्वाधिक वाढली आहे. येथे मागच्या वेळच्या तुलनेत 21 टक्के मतं वाढली आहेत.
'आप'ला मतांच्या टक्केवारीत काही प्रमाणात फटका
आम आदमी पक्षाने निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. परंतु, मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास 38 मतदार संघात 'आप'च्या मतांची टक्केवारी घसरली आहे. त्याचवेळी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पाच मतदार संघात आपची टक्केवारी 10 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. मुस्तफाबाद मतदार संघात गेल्या वेळच्या तुलनेत आपच्या मतांची टक्केवारी 23 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. याव्यतिरिक्त 32 मतदार संघात मतांची टक्केवारी वाढली आहे.
मुस्लीम बहुल मतदार संघात 'आप'ला फायदा
विधानसभा निवडणुकीत मुस्लीम बहुल भागातील मतदार संघात आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी झपाट्याने वाढली आहे. मुस्तफाबाद, मटिया महल, चांदनी चौक, बल्लीमरान आणि सीलमपूर या मतदार संघात आपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मुस्तफाबाद मतदार संघात काँग्रेसची मतं 'आप'कडे वळली आहेत. काँग्रेसला मुस्तफाबाद येथे 2015 च्या तुलनेत 28.8 टक्के कमी मतं मिळाली आहेत.
दिल्लीत 'आप'ला भरभरून मतं
दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आपला एकूण 49 लाख 74 हजार 522 मते मिळाली. तर भाजपाला 35 लाख 75 हजार 430 मते मिळाली आहेत. त्याचवेळी काँग्रेसला केवळ 3 लाख 95 हजार 924 मतं मिळाली आहेत.