Delhi Election Result: निकालापूर्वीच 'या' काँग्रेस उमेदवारानं स्वीकारला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:04 AM2020-02-11T11:04:42+5:302020-02-11T11:11:40+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणीच्या कलांनुसार दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या स्थानी भाजपा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नसून भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेसच सर्वच उमेदवार पिछाडीवर आहेत.
मतमोजणीच्या हाती आलेल्या कलानुसार विकासपुरी विधानसभा जागेवरून काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा पिछाडीवर असून, त्यांनी जवळपास पराभव स्वीकारलेला आहे. त्यांनी ट्विट करत मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांप्रति आभार व्यक्त केला आहे. मुकेश शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. मी माझा पराभव स्वीकारतो, विकासपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. मला आशा आहे की, क्षेत्राचा चारही बाजूंनी विकास होणार आहे. मी भविष्यात दिल्ली, विकासपुरी आणि उत्तम नगर विधानसभा क्षेत्राच्या चतुर्भुज विकासासाठी लढाई लढत राहीन.
भाजपाचे दिल्लीतले प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचाच विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मी आता उदास नाही. भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल, अशी मला आशा आहे. आम्ही आज दिल्लीत सत्तेत येणार आहोत. आम्ही जर 55 जागा जिंकलो तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तत्पूर्वीही मनोज तिवारी यांनी ट्विट करत 48 जागा जिंकण्याचा दावा केला होता.मैं अपनी हार स्वीकार करते हुए, विकासपुरी विधानसभा क्षेत्र के सभी मतदाताओं व कांग्रेस कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करता हूं और आशा करता हूं कि क्षेत्र का चौमुखी विकास होगा।
— Mukesh Sharma (@MukeshSharmaMLA) February 11, 2020
मैं भविष्य में भी दिल्ली, विकासपुरी व उत्तम नगर विधानसभा क्षेत्र के चौमुखी विकास के लिए लड़ाई लड़ता रहूंगा।
हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयल
मतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.