नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणीच्या कलांनुसार दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या स्थानी भाजपा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नसून भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेसच सर्वच उमेदवार पिछाडीवर आहेत.मतमोजणीच्या हाती आलेल्या कलानुसार विकासपुरी विधानसभा जागेवरून काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा पिछाडीवर असून, त्यांनी जवळपास पराभव स्वीकारलेला आहे. त्यांनी ट्विट करत मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांप्रति आभार व्यक्त केला आहे. मुकेश शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. मी माझा पराभव स्वीकारतो, विकासपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. मला आशा आहे की, क्षेत्राचा चारही बाजूंनी विकास होणार आहे. मी भविष्यात दिल्ली, विकासपुरी आणि उत्तम नगर विधानसभा क्षेत्राच्या चतुर्भुज विकासासाठी लढाई लढत राहीन.
हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयलमतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.