BJP Amit Shah: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आलेल्या कलांनुसार भाजपला निर्विवाद बहुमत मिळणार, हे स्पष्ट झालं आहे. मतमोजणीच्या अवघ्या काही फेऱ्या बाकी असताना भाजपने ४५ हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याने तब्बल २७ वर्षांनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजपची सत्ता येणार, हे निश्चित झालं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, "दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला संकटमुक्त केलं आहे. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाहीत, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवला आहे," असा टोला शाह यांनी लगावला आहे.
"दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाचं एक नवं युग सुरू होणार आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला आहे. हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. हा दिल्लीवासीयांनी मोदींची गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या प्रचंड विजयाबद्दल दिल्लीकरांचे मन:पूर्वक आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सर्व आश्वासनांची पूर्तता करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम राजधानी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. लोकांनी मतदानातून दूषित झालेली यमुना नदी, पिण्याचे अस्वच्छ पाणी, खराब रस्ते आणि गल्लोगली निर्माण झालेल्या दारुच्या अड्ड्यांविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे," अशी टीकाही अमित शाह यांनी आम आदमी पक्षावर केली आहे.
दरम्यान, "दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या या दणदणीत विजयाबद्दल मी दिल्ली भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं अभिनंदन करतो. महिलांचा सन्मान, कॉलोनीवासियांचा स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराच्या संधींसह मोदींच्या नेतृत्वात दिल्ली आता एक आदर्श राजधानी होईल," असंही अमित शाह म्हणाले.