- बाळकृष्ण परब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि संपूर्ण देशभरातील लोकांचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अखेर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार करताना केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भावनिक आणि वादग्रस्त मुद्द्यांना झाडून साफ केले. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतल्यास या निकालावर परिणाम करणारे काही मुद्दे स्पष्टपणे दिसून येतात. त्यांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे.
आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेली विकासकामे
2015 मध्ये दुसऱ्यांदा दिल्लीची सत्ता हस्तगत केल्यापासून अरविंद केजरीवाल यांनी ठराविक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत काम सुरू केले. त्यांनी दिल्लीत उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला. केजरीवाल सरकारने उचललेल्या या पावलाचा लाभ दिल्लीतील बहुतांश जनतेला झाला. तसेच मोफत वीज आणि पाणी पुरवण्याचा त्यांचा निर्णय दिल्लीतील गरीब वर्गात बऱ्यापैकी लोकप्रिय झाला. त्याचा लाभ या आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसून आले.
अरविंद केजरीवाल यांचा सकारात्मक प्रचार
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच अरविंद केजरीवाल यांनी सकारात्मक प्रचारावर भर दिला. आपल्या मूळ स्वभावाला मुरड घालत वादग्रस्त मुद्यांवर टीकाटिप्पणी करणे टाळले. अगदी सीएए, एनआरसी आणि शाहीनबागसारखा विषय पेटलेला असताना भाजपाकडूनआपला सातत्याने लक्ष्य करण्यात येत होते. मात्र तरीही अरविंद केजरीवाल यांनी या मुद्यांवर भाष्य करणे कटाक्षाने टाळले.
काँग्रेसने घेतलेली अप्रत्यक्ष माघार
दिल्लीत आप, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत कागदावर दिसत असली तरी प्रत्यक्ष आप आणि भाजपा यांच्यातच मुख्य लढत झाली. तर मतांचे ध्रुवीकरण झाल्यास त्याचा लाभ भाजपाला होईल म्हणून काँग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत फारशी ताकद लावली नाही. त्यामुळे काँग्रेसला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आपकडे वळला.
भाजपाकडून विकासाऐवजी भावनिक मुद्द्यांवर देण्यात आलेला भर
गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातपैकी सातही जागांवर भाजपाला विजय मिळाला होता. त्यावेळी दिल्लीतील 70 पैकी 65 मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली होती. तर आपला एकाही विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली नव्हती. मात्र अशी परिस्थिती असताना दिल्लीत भाजपाकडून सुरुवातीपासूनच नकारात्मक प्रचारावर भर दिला गेला. एकीकडे केजरीवाल विकासाच्या मुद्द्यावर ठाम असताना भाजप मात्र विविध भावनिक मुद्दे प्रचारात आणत होते ही बाब मतदारांना फारशी रुचली नाही.
फसलेले ध्रुवीकरण
नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, शाहीनबाग यासारख्या मुद्द्यांमुळे दिल्लीत मतांचे ध्रुवीकरण होईल आणि त्याच्या लाभ आपल्याला होईल असा भाजपाचा होरा होता. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. उलट काँग्रेसने अप्रत्यक्षपणे माघार घेतल्याने आपला एकगठ्ठा मतदान झाले.
केजरीवाल यांच्याविरोधात लोकप्रिय चेहऱ्याचा अभाव
दिल्लीत भाजपाकडे उत्तम संघटन आणि खंडीभर नेते असले तरी अरविंद केजरीवाल या दिल्लीतील लोकप्रिय चेहऱ्याला आव्हान देईल, असा नेता त्यांच्याकडे नव्हता. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. मात्र दिल्लीतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडे प्रचाराची धुरा होती. मात्र ते आपली छाप पाडू शकले नाहीत. परिणामी भाजपाने प्रचार जोरदार केला तरी त्याचा प्रभाव पडू शकला नाही.