नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत प्रचंड शक्ती पणाला लावूनही भाजपाला दोन आकडी जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्लीतील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करत असून, राज्यात भाजपा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असे नड्डा यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार आम आदमी पक्षाने ६३ जागांवर कब्जा केला असून, भाजपाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रिय नेतृत्वासमोर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने अवलंबलेली रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले की, ''आम्ही आपला पराभव मान्य करतो. मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. आम्ही दिल्लीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू. दिल्लीच्या विकासासंबंधीचे मुद्दे आम्ही वेळोवेळी उपस्थित करू. तसेच आम आदमी पक्ष दिल्लीतील जनतेचा विकास करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी अरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.''
Delhi Election Result: दिल्लीतील दारुण पराभवानंतर भाजपाध्यक्षांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 5:59 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठी प्रचारयंत्रणा कामाला लावूनही भाजपाला दोन आकडी जागा जिंकता आलेल्या नाहीत.
ठळक मुद्देमतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतोआम्ही दिल्लीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावूअरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन