नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला आहे. २०१५ च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात ६२ जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला ८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही.
या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच स्तरातून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन केजरीवालांचे अभिनंदन केले. त्यावर उत्तर देताना अरविंद केजरीवालांनी सांगितले की, तुमचे आभारी आहोत. कॅपिटल सिटीला वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यासाठी केंद्र सरकारसोबत काम करु ही अपेक्षा आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभेत 'कमळ' फुलवण्याचं भाजपाचं २२ वर्षांपासूनचं स्वप्न पुन्हा एकदा 'आप'च्या 'हवे'त विरलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा आम आदमी पार्टीसाठी 'खास' ठरला असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः 'झाडू'न टाकलंय. ७० पैकी ६२ जागा 'आप'ने जिंकल्यात आणि दिल्लीत 'तिसरी बार, केजरीवाल सरकार' आणून दाखवलंय.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचा निकाल हा अपेक्षित होता. मात्र आता आम्ही उर्वरित पक्षांनी एकत्र बसून काम करायला हवे. आज लोकांना एका विचाराच्या अपेक्षा आहे असं सांगतानाच 'भाजप देशावरची ही आपत्ती आहे अशा शब्दात टीका केली. 'या निकालात काहीही आश्चर्य नाही.लोकांनी विकासाला मत दिले आहे. मात्र दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपुरता नसून हे इतर राज्यांमध्येही होऊ शकते. धार्मिक प्रचाराला ठोकारलं आहे, ही अहंकाराला चपराक आहे. ही प्रक्रिया आता सुरु झाली असून अनेक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे असं त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि तब्बल २०० खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्यानं दिल्ली विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज होता. मात्र आपच्या झंझावातासमोर ही निवडणूक कमालीची एकतर्फी झाली. आपनं २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांवर जहरी टीका केली. मात्र दिल्लीकरांनी नकारात्मक राजकारण नाकारलं. शाहीन बागेत सुरू असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलनावरुन भाजपा नेत्यांनी केजरीवालांवर जोरदार टीका केली. या सर्वच नेत्यांना जनतेनं नाकारलं.
महत्त्वाच्या बातम्या
पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा
किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार
भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया
गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका
केजरीवालांना दहशतवादी म्हणणं महागात पडलं; जाणून घ्या 'त्या' तिघांच्या मतदारसंघात काय घडलं?