Mohan Singh Bisht : नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आणखी एका शहराचे नामांतर करण्याची चर्चा सुरु आहे. दिल्लीतील मुस्तफाबाद शहराचे नाव बदलले जाऊ शकते. याबाबत मुस्तफाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार मोहन सिंह बिष्ट यांनी विजयानंतर सांगितले की, मी जिंकलो तर मुस्तफाबादचे नाव शिवपुरी किंवा शिव विहार करेन, असे म्हटले होते.
आता मी निवडणूक जिंकली आहे आणि लवकरच नामांतराचे काम केले जाईल. ज्या ठिकाणी हिंदू लोकसंख्या आहे. हिंदू लोक जिथे राहतात, तेथील नाव मुस्तफाबाद नसून शिवपुरी किंवा शिवविहार असले पाहिजे. ज्यावेळी लोक मुस्तफा नावाबद्दल चिंता व्यक्त करतात, तेव्हा हे नाव बदलण्याचे काम नक्कीच केले पाहिजे.त्यामुळे नामांतराचे काम लवकरच केले जाईल, असे मोहन सिंह बिष्ट यांनी सांगितले.
पुढे मोहन सिंह बिष्ट म्हणाले की, मला २५ वर्षांचा अनुभव आहे, जर पक्षाने मला कोणतीही जबाबदारी दिली तर मी ती नक्कीच पार पाडेन. अनुभवात जास्त शक्ती असते, असे मला वाटते आणि त्यानुसार काम करण्यावर माझा विश्वास आहे. तसेच, दिल्लीच्या जनतेने ज्या पद्धतीने मला जनादेश दिला आहे, मी त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवीन. मी माझ्या परिसरातील लोकांचा आदर राखेन, असे मोहन सिंह बिष्ट म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अभिनंदन करण्यासाठी फोन आला होता. सरकार स्थापनेबद्दल किंवा मुख्यमंत्रीपदाच्या नावाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाबद्दल खोटी अफवा पसरवली जात आहे. भाजपचा कोणी ना कोणी कार्यकर्ता मुख्यमंत्री होईल. तसेच, मी अमित शाह यांच्याकडे वेळ मागितला आहे. वेळ मिळाला तर मी त्यांना भेटेन, असेही मोहन सिंह बिष्ट यांनी सांगितले.