Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. दिल्ली विधानसभेतील एकूण ७० पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या आहेत. आपची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. आपला २२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. एक्झिटपोल अगदी खरे ठरल्याचे चित्र आहे. मात्र, निकालाच्या या संपूर्ण धामधुमीत, "जर आप आणि काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढली असती तर निकाल काय राहिला असता? असा प्रश्न अनेकांना पडला असेल आणि तो पडणेही स्वाभाविक आहे.
खरे तर, निवडणुकीच्या राजकारणात 'जर' आणि 'तर'ला फारसे महत्व नसते. पण तरीही, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. हे आकडे पाहून, काँग्रेस आणि आप एकत्रपणे निवडणूक लढले असते तर...? असा प्रश्न आपल्याही मनाला पडेल. मात्र प्रत्यक्षात असे झाले नाही. हे दोन्हीही पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि एकमेकांविरोधात निकराने लढले. यानंतर आज जो निकाल आला आहे, तो आपल्या समोर आहेच.
भाजप, आप आणि काँग्रेस, कुणाला किती मतं मिळाली? असं आहे गणित -या निवडणुकीत भाजपला जवळपास ४५.५६ टक्के मतांसह एकूण ७० पैकी ४८ जागा मिळाल्या आहेत. आपला ४३.५७ टक्के मतांसह एकूण 22 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला ६.३४ टक्के मते मिळाली आहेत. त्यांना खातेही उघडता आले नाही.
जर काँग्रेस-आप एकत्र लढले असते तर, चित्र काहीसे वेगळे असते...?आता आप आणि काँग्रेसला मिळालेल्या एकूण मतांची बेरीज केली, तर हा आकडा ४९.९१ टक्के एवढा होतो. म्हणजेच, भाजपच्या ४५.५६ टक्के या आकड्याच्या तुलनेत ४.३५ टक्क्यांनी अधिक. अर्थात, काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते आणि मतांची टक्केवारी अशीच राहिली असली, तर चित्र बदललेले दिसू शकले असते आणि कदाचित दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी सरकार बनवण्याच्या स्थितीतही दिसले असते. मात्र असे झाले नाही. हरियाणा निवडणुकीची पुनरावृत्ती झाली. दोघांचेही नुकसान झाले, असे म्हणता येऊ शकेल. तेथेही आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते आणि दोघांचेही नुकसान झाले आणि भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले.