Delhi Election Results: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर यश मिळवता आलं. या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारत लोकांसाठी काम करत राहू असं म्हटलं. दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केला. त्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. यावेळी राज्यपालांनी तुम्ही यमुनेच्या शापामुळे हरलात असं विधान केलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी व्हीके सक्सेना यांनी यमुनेच्या प्रदूषणावरुन आतिशी यांना चांगलेच सुनावले. तुम्हाला यमुना मातेने शाप दिला आहे. यमुना स्वच्छ करण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलायला हवी होती, असं व्हीके सक्सेना यांनी म्हटलं. आतिशी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान एलजी सक्सेना यांनी वायू प्रदूषणाबाबत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचाही उल्लेख केला. राज्यपाल सचिवालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी रचनात्मक पावले उचलण्यासाठी अनेक पत्रे लिहिली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुम्हाला यमुना मातेचा शाप आहे. तुम्ही लोकांनी यमुना स्वच्छ करायला हवी होती. त्यासाठी पावले उचलायला हवी होती. आमच्या सचिवालयाने अनेक उपायसुद्धा सुचवले होते, असं नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणाले. या विधानावर आतिशी किंवा आम आदमी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
२७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडले होते. पक्षाने आतिशी यांना नवे मुख्यमंत्री केले होते. निवडणुकीतील पराभवानंतर आतिशी यांनी रविवारी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.