नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला आहे. आपच्या पारड्यात 62 जागा तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. पुन्हा एकदा दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. आपने नऊ महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. नऊ पैकी आठ महिलांनी घवघवीत यश मिळवले आहे. केवळ सरिता सिंग यांना यंदा पराभव पत्करावा लागला आहे.
आप, भाजपा, काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी दिल्लीची निवडणूक ही महत्त्वाची होती. तिन्ही पक्षाने एकूण 24 महिलांना उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. काँग्रेसने सर्वाधिक 10 महिलांना तिकीट दिले होते. आपच्या बंदना कुमारी यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. तर तीन महिला दुसऱ्यांदा तर चार महिला प्रथमच निवडून आल्या आहेत. आपने 2008 मध्ये पाच, 2015 मध्ये सहा आणि यंदा नऊ महिलांना संधी दिली. जितेंद्र सिंग तोमर यांच्याऐवजी आपने त्यांच्या पत्नी प्रिती यांना उमेदवारी दिली होती. त्या विजयी झाल्या आहेत.
यंदा संधी दिलेल्यांमध्ये आतिशी (कालकाजी), भावना गौड (पालम), प्रमिला टोकस (आर के पुरम), राखी बिडला (मंगोलपुरी), बंदना कुमारी (शालिमार बाग), राजकुमारी धिल्लो (हरिनगर), धनवंती चंडेला (राजौरी गार्डन), प्रिती तोमर (त्रिनगर) यांनी विजय प्राप्त केला आहे. आतिशी, राजकुमारी आणि धनवंती या तीन नव्या चेहऱ्यांना आपने रिंगणात उतरवले होते. त्यांचाही विजय झाला आहे. आतिशी यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपयश आले होते. राजकुमारी या पश्चिम दिल्लीत काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या. त्या नुकत्याच आपमध्ये दाखल झाल्या होत्या.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा नवी दिल्ली मतदारसंघातून 19 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तेच तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर तासाभरताच दिल्लीत आपची सत्ता येण्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या 22 वर्षांपासून दिल्लीत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपा नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला यंदाही सुरूंग लागला आहे. गेल्या महिनाभराच्या विखारी प्रचारामुळे दिल्लीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. या प्रचाराला केजरीवाल यांनी अत्यंत संयत उत्तर दिल्याने मतदारांचा विश्वास जिंकण्यात अखेर आपचे उमेदवार यशस्वी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र
Delhi Election: दिल्लीत आम आदमीचेच राज्य!
Delhi Election : आपच्या आमदारावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्याचा मृत्यू
Delhi Election: केजरीवालांच्या प्रतिमासंवर्धनाची यशस्वी कहाणी
Delhi Election: विरोधकांना नवचैतन्य ही भाजपसाठी धोक्याची घंटा