नवी दिल्ली - आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने बंपर विजय मिळवला. आपच्या या विजयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांसोबत इतर अनेक घटकांनीही निर्णायक भूमिका बजावली होती. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी दर्शन घेतलेल्या दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमंताचा आशीर्वादही त्यांच्या विजयात निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निकालानंतर दिल्लीकर मतदारांचे आभार मानून झाल्यानंतर केजरीवाल यांनी त्यांच्यासाठी संकटमोचक ठरलेल्या बजरंगबली हनुमानाचरणी धाव घेतली.
या निवडणुकीत प्रचाराच्या निर्णायक टप्प्यावर केजरीवाल यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्या दर्शनाचा मतदारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला होता. त्यामुळे आज निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे सपत्निक कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराला भेट दिली आणि मारुतीरायांचे दर्शन घेतले. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुद्धा उपस्थित होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुविकरणाचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला. तसेच आम आदमी पक्ष हा मुस्लिम धार्जिणा असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. आपल्या विरोधी पक्षाला मुस्लिम धार्जिणे ठरवून ध्रुविकरण घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून याआधी अनेकदा झाला. तसेच त्यात त्यांना यशही मिळाले होते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने हे अस्त्र काँग्रेसवर चालवून काँग्रेसचा दारुण पराभव घडवून आणला होता.