नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. केजरीवाल हे सलग तिसऱ्यांदा राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. त्यातच केजरीवाल यांच्या पत्नीचा वाढदिवसही निकालाच्या दिवशीच होता. त्यामुळे केजरीवाल कुटुंबीयांच्या आनंदात भर पडली होती. 'आप'च्या विजयानंतर केजरीवाल यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिल्या.
या निवडणुकीत केजरीवाल यांचे चिरंजीव पुलकीत केजरीवाल यांनी पहिल्यांदाच मतदान केले होते. यावर पुलकीतला विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, पहिल्यांदाच मतदान केले आणि तेही आपल्या पित्याला केले. दिल्लीतील जनतेने प्रचंड बहुमताने 'आप'ला विजयी केले. त्यामुळे माझं मत कामी आल्याचा आनंद असल्याचे पुलकीतने सांगितले.
केजरीवाल यांची मुलगी हर्षिता म्हणाली की, विरोधकांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिले आहे. विरोधकांनी शिव्या-शाप देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे त्यांना मतं मिळाली नाही. काम केल्यावर मतं मिळतात. त्यासाठी रुग्णालय, शाळा आणि मोहल्ला क्लिनीक सुरू करावे लागते, असा टोला हर्षिताने विरोधकांना लगावला.
दरम्यान दिल्ली विधानसभेत आपला 60 पेक्षा कमी जागा येईल याचा आम्ही विचार केलाच नव्हता. मी स्वत: बुथ लेव्हलवर काम केले. प्रचाराच्या काळात लोकांचा उत्साह पाहिला. त्यामुळे आपचा दणदणीत विजय होईल, असा विश्वास होता, असंही हर्षिताने सांगितले.