नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'ला एकहाती सत्ता दिली आहे. विधानसभेच्या 70 पैकी 62 जागांवर आपचा विजय झाला असून भाजपाला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीतही भोपळाही फोडता आलेला नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदार व बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षात प्रवेश केला होता. मात्र महाराष्ट्रातील जनतेनंही पक्ष बदलणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का दिला होता. तोच कित्ता दिल्लीकरांनीही गिरवला असल्याचे यंदाच्या दिल्ली विधानसभेच्या निकालाद्वारे दिसून आले. सत्तेतील आम आदमी पार्टीमधून बाहेर पडून भाजप व काँग्रेसच्या वाटेवर गेलेल्यांचा मतदारांनी यंदा पराभव केला. कपिल मिश्रा, अलका लांबा, अनिल बाजपेयी, आदर्श शास्त्री यांना अरविंद केजरीवाल यांची साथ सोडणे महागात पडले.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीमधून निवडून येणाऱ्या अलका लांबा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अलका लांबा यांनी चांदणी चौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रल्हाद सिंह साहनी यांनी अलका लांबा यांचा जवळपास 46 हजार मतांनी पराभव केला आहे.
आपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांनी देखील भाजपात प्रवेश करुन मॉडल टाउन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु आपचे उमेदवार अखिलेश पति त्रिपाठी यांनी 11133 हजार मतांनी कपिल मिश्रा यांना पराभूत केले. आपमधून भाजपमध्ये गेलेल्या अनिल बाजपेयी यांना कशीबशी विजयाला गवसणी घालता आली. आपच्या आदर्श शास्त्री यांनी उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये ती मिळविली परंतु त्यांना देखील निवडणुकीत तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.