नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसमध्ये अफरातफर माजली आहे. काँग्रेसच्या पार्टीच्या 63 उमेदवारांचं या निवडणुकीत डिपॉझिटही जप्त झालं. या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अरविंद केजरीवालांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली निवडणूक प्रभारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी चाको यांनी आपच्या उदयानंतर काँग्रेसला आपले मतदार परत मिळवता आलेले नसल्याचं म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपच्या विजयानंतर काँग्रेसला झालेल्या आनंदावर निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांच्या ट्विटला रिट्विट करत शर्मिष्ठा म्हणाल्या, काँग्रेसनं आपलं दुकान बंद करून टाकलं पाहिजे काय?. त्यामुळे काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे. शर्मिष्ठा पी. चिदंबरम यांचं ट्विट रिट्विट करत म्हणाल्या, सर, काँग्रेस पक्ष भाजपाला हरवण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांचं आऊटसोर्सिंग करत आहेत का?, जर तसं करत नसल्यास पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपच्या विजयाचा आनंद साजरा का करत आहे? आणि जर असंच सुरू राहणार असल्यास आपण आपलं दुकान बंद केलं पाहिजे. शर्मिष्ठा मुखर्जींनी पी. चिदंबरम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:12 PM