नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणुकीच्या सुरूवाती कलांमध्ये आम आदमी पार्टीने आघाडी मिळविल्यानंतर ट्विट केले आहे. ते म्हणाले, "भारताच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल दिल्लीचे आभार!"
याचबरोबर, प्रशांत किशोर यांनी आपच्या कार्यालयात जाऊन अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आम आदमी पार्टीने 56 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 14 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळवता आले नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.
दरम्यान, जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या धोरणांना विरोध दर्शविणारे प्रशांत किशोर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.