नवी दिल्ली - दिल्लीत मतदान झाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा दिल्ली भाजपा प्रदेश कार्यालयात निवडणुकीवर मंथन सुरू होतं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष, निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्यासह दिल्लीतील सर्व खासदार आणि दिल्लीतील इतर नेत्यांसमवेत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला.
दिल्ली निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची असू शकते असे म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आम आदमी पक्षाच्या एक्झिट पोलमधील विजय नाकारला आहे. त्यामुळे भाजपा एक्झेट पोलची प्रतीक्षा करेल. दिल्लीतील निवडणुकीमध्ये भाजपाच जिंकेल आणि एक्झिट पोल आणि अंतिम निकालांमध्ये मोठा फरक असेल, असं जावडेकरांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतही एक्झिट पोल चुकीचे ठरले होते असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले की, आम्ही ग्राऊंड पातळीवरचा आढावा घेतला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून येतं. ११ फेब्रुवारीला आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू असं त्यांनी सांगितले. दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनीही एक्झिट पोल चुकीचा असल्याचे म्हटलं आहे.
या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतदानाच्या परिस्थितीची आढावा घेण्यात आला. २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत नामनिर्देशन झाल्यापासून अमित शहा यांनी ४२ पदसभा घेऊन भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेवटचे क्षणापर्यंत भाजपा नेते रिंगणात राहिले. दिल्ली निवडणुकीत प्रचार करणाऱ्या नेत्यांकडून मतदानाची माहिती या बैठकीत घेण्यात आली.
दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या सर्व बड्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी ‘आप’ प्रतिनिधींना सर्व ईव्हीएम खोल्यांमध्ये तैनात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ईव्हीएममध्ये छेडछाड होणार नाही यासाठी जागरुक राहण्याचे निर्देश दिले आहेत.