Delhi Election: भाजप-काँग्रेसचे ‘रोड शो’, आपची ‘झाडू यात्रा’; अमित शहा, राज बब्बर यांनी गाजवला दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 05:31 AM2020-02-07T05:31:04+5:302020-02-07T06:15:51+5:30
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजप आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजप आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बॉलीवूड स्टार खासदार सनी देओल, तर काँग्रेससाठी अभिनेता तसेच खासदार राज बब्बर यांनी ‘रोड शो’ व पदयात्रा केल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. गुरुवारचा दिवस सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा साऱ्यांनीच प्रयत्न केला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील भाषण महत्त्वाचे होते. पण दुसरीकडे अभिनेता सनी देओल याने उत्तमनगर येथे भाजपच्या उमेदवारासाठी रोड शो केला. सनी देओलचे चाहत्यांनीही या रॅलीमध्ये गर्दी केली होती. दुसरीकडे राज बब्बर यांनी कालकाजी येथे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुभाष चोपडा यांच्यासोबत रोड शो केला. त्यालाही काँग्रेस समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
आम आदमी पार्टीचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद व मतदारांच्या भेटींवर समाधान मानले. केजरीवाल यांनी आपल्या नवी दिल्ली मतदारसंघात बुधवारी रात्री ‘रोड शो’ केला होता. त्यानंतर आज रोजगार मंत्री गोपाल राय यांनी आपल्या बाबरपूर मतदारसंघात ‘झाडू चलाओ यात्रा’ आयोजित केली. ‘रोड शो’च्याच स्वरुपातील ही यात्रा संपूर्ण मतदारसंघात काढण्यात आली.
अमित शहा यांचा अखेरच्या दिवशीही झंझावात
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो करून झंझावात कायम ठेवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या प्रचाराची धुरा अमित शहा यांनी सांभाळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केवळ दोन जाहीर सभा घेतल्या. याशिवाय अमित शहा यांनीच दिल्लीतील प्रचारात दररोज पुढाकार घेतला आहे.
प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी त्यांनी मादीपूर, हरीनगर, सीमापुरी या भागात रोड शो करून लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. लोकांचा कल बदलल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी बोलणार असतानासुद्धा अमित शहा यांनी लोकसभेत न थांबता प्रचारात गुंतून राहिले.
भाजपने प्रचारासाठी दिल्लीच्या बाहेरील नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. जवळपास २०० खासदारांनी दिल्लीच्या प्रचारात थेट भाग घेतला. या सर्वांना दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये प्रचार करण्यास बाध्य केले होते. अमित शहा रस्त्यावर उतरून प्रचार करीत आहेत.
काऊंटडाऊन सुरू
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला असून मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. जवळपास १ कोटी ४६ लाख मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य आहे. यातील ८० लाख ५५ हजार पुरुष व ६६ लाख ३५ हजार महिला मतदार आहेत.७० मतदारसंघांमध्ये २६८८ मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील ५१६ मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.