Delhi Elections: नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भाजप समर्थकांना संबोधित केले आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "काही दिवसांपूर्वी मी एका 'कट्टर' भाजप समर्थकाला भेटलो होतो. त्यांनी मला विचारले की, जर तुमचा पराभव झाला तर काय होईल? मी हसत हसत म्हणालो, जर माझा पराभव झाला तर तुमचे काय होईल? असा प्रश्न करत त्यांना विचारले. तुमच मुले कुठे शिकायला जातात. ते म्हणाले, सरकारी शाळेत, कारण आता शाळा चांगल्या आहेत आणि शिक्षकही चांगले आहेत."
"भाजप समर्थकाला विचारले की, भाजपशासित कोणत्या राज्यात आमच्यापेक्षा चांगल्या शाळा आहेत, ते म्हणाले - एकाही नाही. मी म्हणालो की जर मी ही निवडणूक हरलो तर मोफत वीज, मोफत पाणी, मोफत आरोग्य सेवा, महिलांसाठी मोफत बस सेवा आणि चांगले शिक्षण, या सर्व गोष्टी बंद होतील आणि तुम्हाला यासाठी जवळपास २५,००० रुपये खर्च करावे लागतील", असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी भाजप समर्थकाला राजकारण आणि भाजप विसरून कुटुंबाचा विचार करायला सांगितले. ते म्हणाले - या निवडणुकीत मी तुम्हाला मतदान करेन, पण भाजप सोडणार नाही. मी सर्व भाजप समर्थकांना आवाहन करतो की जर भाजप सत्तेत आला तर आमच्या सर्व योजना बंद केल्या जातील. जर असं झालं तर तुम्हाला जवळपास २५,००० रुपये खर्च होतील. तुमच्याकडे इतके पैसे आहेत का? तुम्हाला माझा पराभव परवडेल का?"
"तुमचा भाऊ, या नात्याने मी तुम्हाला या निवडणुकीत मला मतदान करण्याचे आवाहन करतो. तसेच, भाजप सोडायचे की नाही हा तुमचा निर्णय आहे, मात्र, या निवडणुकीत आम्हाला मतदान करा", असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. दरम्यान, आपच्या ७ आमदारांनंतर आता ८ व्या आमदाराने राजीनामा दिला आहे. मादीपूर मतदारसंघातील आपचे आमदार गिरीश सोनी यांनी राजीनामा दिला आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे आता आपच्या अडचणी वाढल्या आहेत.