Delhi Excise policy case (Marathi News) नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातव्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (२२ फेब्रुवारी) समन्स पाठवले असून येत्या सोमवारी (२६ फेब्रुवारी) चौकशीसाठी बोलावले. यापूर्वी, अरविंद केजरीवाल सोमवारी (१९ फेब्रुवारी) ईडीसमोर हजर होणार होते, परंतु ते हजर झाले नाहीत.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. आतापर्यंत ईडीने अरविंद केजरीवाल यांनी सात वेळा समन्स पाठवले आहे. दरम्यान, मागील समन्सवेळी आपने ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आपने एक निवेदन जारी करून म्हटले होते की, 'ईडीच्या समन्सच्या वैधतेचे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी ईडी स्वतः न्यायालयात गेली आहे. अशा परिस्थितीत ईडीने वारंवार समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.'
दरम्यान, ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीच्या तक्रारीत, अरविंद केजरीवाल जाणूनबुजून समन्सचे पालन करू इच्छित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, जर त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ सार्वजनिक अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन केले तर ते सामान्य माणसासाठी वाईट उदाहरण ठरेल, असेही ईडीने म्हटले आहे.
ईडीने अरविंद केजरीवाल यांना कधी-कधी पाठवले समन्स?ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते. या समन्सवर ते हजर झाले नाहीत. त्यानंतर ईडीने २१ डिसेंबर २०२३ रोजी दुसरे समन्स पाठवले, त्यालाही अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. ३ जानेवारी २०२४ रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना तिसरे समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. १७ जानेवारी २०२४ रोजी ईडीने चौथे समन्स पाठवले, पण अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा गैरहजर राहिले. यानंतर २ फेब्रुवारी २०२४ रोजी ईडीने पाचवे समन्स पाठवले, पण अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. १४ फेब्रुवारीला सहावे समन्स पाठवल्यानंतर ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला बोलावले, पण अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. आता २२ फेब्रुवारीला सातवे समन्स पाठवले आहे.