दिल्ली: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताच्या कुटुंबीयांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. पोलिसांनी पिटबुल आणि पाळीव कुत्र्याची मारामारी लावली, असा आरोप कुटुंबानं केला आहे. दिल्ली पोलिसांचं पथक रोहिणीतल्या बेगमपूरमध्ये लूट प्रकरणातील एका आरोपीला पकडायला गेले होते. तिथे त्यांनी कुत्र्यांची मारामारी लावल्याचा आरोप कुटुंबानं केला आहे.
पोलिसांनी दोन कुत्र्यांची मारामारी घडवून आणली. त्यात पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबानं केला. व्हिडीओमध्ये कुत्र्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. कुत्र्यांची मारामारी सुरू असताना पोलीस टाळ्या वाजवत आहेत. या प्रकरणी महानगर दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत
कुत्र्यांच्या संघर्षाचा व्हिडीओ कुटुंबातील एका सदस्यानं फोनवर रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये पोलीस टाळ्या वाजवताना, कुत्र्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. त्यानंतर व्हिडीओमध्ये अचानक अंधार दिसतो. मात्र ऑडिओ ऐकू येत आहे. कुटुंबातील सदस्य पोलिसांकडे विनंती करताना दिसत आहेत.
पोलिसांनी कुटुंबातील सदस्याला ताब्यात घेऊन त्याला मारहाण केल्याचा आरोपदेखील कुटुंबानं केला आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे पाठीला, डाव्या हाताला दुखापत झाल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसे आदेश दंडाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.