Delhi Farmers Protest : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी सरकारविरोधात निदर्शनं करत आहेत. दिल्लीत 'गाव बचाओ देश बचाओ' अभियान राबवून शेतकरी आंदोलन करत आहेत. रविवारी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेस्ट एन्क्लेव्ह मेट्रो स्टेशनचं नाव बदललं. शेतकऱ्यांनी वेस्ट एन्क्लेव्ह मेट्रो स्टेशनचं नाव काळ्या शाईनं पुसून तिथं मंगोलपूर कला मेट्रो स्टेशन लिहिलं आहे. यासंबंधीचे वृत्त एका हिंदी वेबसाइटनं दिलं आहे.
शेतकऱ्यांनी 'गाव बचाओ देश बचाओ' अभियानाद्वारे आतापर्यंत दिल्लीतील ३०० हून अधिक गावांना भेटी दिल्या आहेत. पालम ३६० खापचे प्रमुख चौधरी सुरेंद्र सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. गावातील जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनला गावाचं नाव द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वेस्ट एन्क्लेव्ह मेट्रो स्टेशनचं नाव काळ्या शाईनं पुसून त्या जागी मंगोलपूर काला असं लिहिलं आहे.
दिल्लीतील गावाचं नाव व चिन्ह पुसून टाकू नये. गावाच्या जमिनीवर बांधलेल्या मेट्रो स्टेशनला गावाचं नाव द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, याआधी शनिवारी आपली मागणी सरकारने मान्य केली नाही तर आगामी निवडणुकांवर सर्व गावातील जनता बहिष्कार टाकेल, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला.
याचबरोबर, २२ डिसेंबरला दिल्लीतील खेड्यापाड्यातील शेतकरी एकत्र येऊन महापंचायत घेणार असून, त्यामध्ये आंदोलनाची पुढील रणनीती ठरणार आहे. तसेच, दिल्लीतील गावांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.