नवी दिल्ली - दिल्लीतील नारायणा इंडस्ट्रीयलमधील पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (14 फेब्रुवारी) सकाळी सात वाजता ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 29 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ही भीषण आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे फॅक्टरीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
याआधी दिल्लीतील करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा आणि एका महिलेचा समावेश होता. तर भाजलेल्या व्यक्तींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीतील किर्ती नगर परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर आणि सामान जळून खाक झाले होते.