दिल्लीतील डोळ्यांच्या रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. 'Eye7 Chaudhary Eye Hospital' असं या रुग्णालयाचं नाव आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आजूबाजूच्या लोकांनी फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली असून ती भयंकर असल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता अग्निशमन विभागाला आगीबाबतची माहिती देण्यात आली, त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच नेमकं किती नुकसान झालं आहे याबाबत देखील अद्याप समजू शकलेलं नाही.
दिल्लीतील आणखी एका रुग्णालयात भीषण आग
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका लहान मुलांच्या रुग्णालयात भीषण आग लागली होती, ज्यामध्ये काही बाळांना आपला जीव गमवावा लागला. दिल्लीतील विवेक विहार येथे असलेल्या बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी २५ मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. या भीषण अपघातात १२ मुलांना रेस्क्यू करण्यात आलं. त्यापैकी ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पाच मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बेबी केअर सेंटरमधील आगीचं संभाव्य कारण ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट असल्याचं सांगण्यात आलं. रुग्णालयाच्या आजूबाजूच्या इमारतींनाही आगीचा फटका बसला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की मुलांचे बचाव कार्य अत्यंत अवघड होते. मुलांना खिडकीतून बाहेर काढण्यात आलं.