नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दिल्लीच्या बदरपूर परिसरातील एका बाजारात अत्यंत वेगाने एक पाण्याचा ट्रँकर घुसला आणि त्याने लोकांना चिरडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदरपूर (Badarpur) भागातील खान सब्जी मंडी (Khan Sabzi Mandi) येथे दिल्ली (Delhi) जल बोर्डाचा टँकर (Water Board Tanker) गर्दीत घुसला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींना तातडीने अपोलो आणि एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील तीन जणांना थोडीच दुखापत झाली आहे. तर दोघांना फ्रॅक्चर झालं असून एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. टँकर जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच टँकर मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाजारात लोक खरेदीसाठी फिरत आहेत. याच दरम्यान, दिल्ली जल बोर्डाचा पाण्याचा टँकर अनियंत्रित झाला आणि थेट गर्दीत घुसला. लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात, टँकरचा वेग खूप जास्त असल्याने काही लोक चिरडले गेल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.