delhi floods 2023 : देशाची राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सोमवारपासून यमुनेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा स्थितीत आज सकाळी हातिनीकुंड बॅरेजमधून १ लाख ५३ हजार ७६८ क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर यमुनेच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी इतर भागात स्थलांतरित होत आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने बुधवारी दुपारी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
गौतम गंभीरने लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर मदत पोहचवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपा खासदाराने आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना गंभीरने म्हटले, "आम आदमी पार्टीने मागील ९ वर्षे केवळ आरोपांचे राजकारण केले आहे. त्यांनी दिल्लीतील पायाभूत सुविधांवर एक पैसाही खर्च केला नाही, फक्त सोयीचे राजकारण केले, घरे बांधण्याचे राजकारण केले, लोकांना मूर्ख बनवण्याचे राजकारण केले. आता ते बाहेर येत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही 100MM पावसाची तयारी केली होती, पण तो 150MM झाला. 'आप'चे नेते फक्त त्यांचे फोटो काढण्यासाठी पाण्याच्या मध्यभागी जाऊन उभे राहतात. त्यांनी इथे येऊन लोकांची अवस्था पाहायला हवी."
पावसाचा हाहाकार उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.