नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तारिक अन्वर यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
का दिला होता राजीनामा?
तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत त्यांनी राजीनामा दिला होता. राफेल डील प्रकरणात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर म्हणाले होते.
हिंदीतही वाचा ही बातमी :
फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर मी असहमत आहे. मी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांचा व्यक्तिगतरीत्या मी सन्मान करतो. परंतु त्यांचं हे विधान दुर्दैवी आहे. या विधानानं मला अतीव दुःख झाल्यानं मी हे पाऊल उचललं आहे, असं म्हणत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला होता.
सर्व विरोधी पक्ष राफेल डीलवर एकत्र आहेत. राफेल प्रकरणात मोदींचं समर्थन करणं चुकीचं आहे. शरद पवारांबद्दल मला आदर आहे. पक्ष सोडणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. महाराष्ट्रात भाजपाला राष्ट्रवादीनं देऊ केलेला बिनशर्त पाठिंबा ही शरद पवारांनी केलेली मोठी चूक होती. शरद पवारांच्या विधानानंतर 24 तास मी वाट पाहिली, परंतु पवार साहेबांनी कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यानं मी राजीनामा दिला आहे. पवार साहेबांसाठी असलेला आदर कायम राहील. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे, असेही तारिक अन्वर यांनी म्हटलं होतं.