G20 Summit 2023 in Delhi: राजधानी दिल्लीत आयोजित G-20 शिखर परिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीला पोहोचू लागले आहेत. या G-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण 15 बैठका घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन बैठका आज अमेरिका, बांगलादेश आणि मॉरिशसच्या राष्ट्रप्रमुखांसोबत करणार असून, यात राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
उद्या म्हणजेच, 9 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यूके, जपान, जर्मनी आणि इटलीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत बैठका घेतील. तसेच, 10 सप्टेंबर रोजी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय, कोमोरोस, तुर्की, UAE, दक्षिण कोरिया, EU/EC, ब्राझील आणि नायजेरियासोबतही बैठका होणार आहेत.
अमेरिकेचे NSA जेक सुलिवन हेदेखील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत भारतात येत आहेत. हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक वस्तूंचे वितरण, यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांवर जागतिक नेत्यांसोबत सहकार्य करण्याची जी-20 शिखर परिषद ही एक महत्त्वाची संधी असल्याचे ते म्हणाले. बदल घडवून आणू शकतील, अशा उपक्रमांवर काम करण्याचा आमचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.