नवी दिल्ली- मुलीवर अन्याय-अत्याचार झाल्यास मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आई-वडील दिवस रात्र झटताना पाहायला मिळतात. पण नवी दिल्लीतील एक प्रकरण सर्वांनाच धक्का देणारं आहे. मुलीवर बलात्कार झाल्यानंतर मुलीच्याच आई-वडिलांनी आरोपीकडून पैसे घेऊन प्रकरण सेटल करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. 18 वर्षीय पीडित मुलीने स्वतः हिम्मतीने आई-वडिलांविरोधात तक्रार केली आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये दिल्लीच्या अमन विहारमध्ये या मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित मुलीचं दोन अज्ञात व्यक्तिंनी अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील एक आरोपी जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला.
कोर्टात साक्ष फिरविण्यासाठी व तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने पीडित मुलीच्या आई-वडिलांना 20 लाख रुपयांची ऑफर दिली. मुलीने कोर्टात साक्ष फिरविली तर 20 लाख रुपये देण्याचं आरोपीने कबूल केलं होतं. सुनील शाही असं जामिनावर सुटलेल्या आरोपीचं नाव आहे. सुनिलने 8 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आई-वडिलांना पैशांची ऑफर दिली. सर्वात धक्कादायक म्हणजे मुलीच्या आई-वडिलांनी पैशांची ऑफर धुडकावून न लावता अॅडव्हान्स पैशांची मागणी केली. मुलीचं मन वळविण्याचे प्रयत्न आम्ही सुरू करू, यासाठी अॅडव्हान्स पैसे द्यावे लागतील, असं पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी सुनिलला सांगितलंय
सुनिला जेव्हा पीडित मुलीच्या आई-वडिलांना भेटला तेव्हा ती तिच्या रुममध्ये होती. तिने हे सर्व बोलणे ऐकले. आरोपी सुनिल तिथून निघून गेल्यानंतर ती बाहेर आली व तिने आई-वडिलांना जाब विचारला. त्यावर ते साक्ष फिरवण्यासाठी मुलीची मनधरणी करु लागले. मी तक्रार मागे घेण्यास नकार दिला पण माझे आई-वडिल माझी समजूत काढत होते. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी मला मारहाण सुद्धा केली. त्यानंतर गरीबीचे कारण देऊन मला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, असं पीडित मुलीने सांगितलं.
मला मारहाण करून झाल्यावर घरी एका व्यक्तीने पाच लाख रुपये आणून दिले. माझ्या आई-वडिलांनी ते पैस घरात पलंगाखाली लपवून ठेवले व ते कोर्टात जाण्यासाठी बाहेर पडले. आई-वडील घराबाहेर गेल्यावर मुलीने पैशांची बॅग उचलून अमन विहार पोलीस ठाणे गाठलं व तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल करत मुलीच्या आईला अटक केली आहे. मुलीने पोलिसात तक्रार केल्याचं मुलीच्या आईला माहिती नव्हतं. त्यामुळे मुलीची आई कोर्टातून थेट घरी आली. घरी येताच पोलिसांनी तिला अटक केली. मुलीची आई अटक झाल्याचं समजल्यानंतर मुलीचे वडील फरार झाले आहेत.