Kumar Vishwas Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवालांसह पहिल्या फळीतील बड्या नेत्यांसह आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आम आदमी पक्षाला २२ जागांपर्यंतच मजल मारता आली. तर दुसरीकडे भाजपने जोरदार मुसंडी मारत प्रचंड बहुमत मिळवले. या निकालानंतर अरविंद केजरीवालांवर त्यांचे एकेकाळचे सहकारी कुमार विश्वास यांनी सडकून टीका केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर एएनआयशी बोलताना कुमार विश्वार म्हणाले, "सर्वात आधी तर भाजपच्या लोकांना विजय मिळाला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आशा करतो की, जो जनादेश दिल्लीच्या जनतेने त्यांना दिला आहे, त्याची ते परिपूर्ति करतील."
दिल्लीला मुक्ती मिळाली, केजरीवालांना म्हणाले, 'नीच माणूस'
कुमार विश्वास म्हणाले, "आम आदमी पक्षाचे ते सगळे लाखो-कोट्यवधी कार्यकर्ते, जे अण्णा आंदोलनातून पुढे आले. ज्यांचे खूप निर्मळ, निष्पाप आणि भारताच्या राजकारणाला बदलण्याच्या स्वप्नाची हत्या एका निर्लज्ज, नीच, मित्राला धोका देणाऱ्या चारित्र्यहीन व्यक्तीने केली. त्याच्याप्रती काय संवेदना व्यक्त करायच्या. दिल्लीला त्याच्यापासून मुक्ती मिळाली", अशी टीका कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवालांवर केली.
'सत्तेच्या लालसेपोटी थांबलेले दुसऱ्या पक्षात जातील'
"मला हे माहिती आहे की, आता आम आदमी पक्षात जे लोक राहिले होते, सत्तेच्या लालसेपोटी, पदांसाठी, पैशाच्या मोहापायी ते सगळे आता परत जातील. काही आपापल्या व्यवसायात परततील, काही इतर पक्षात जातील. आता त्या लोकांची सुरूवात झाली आहे", असेही कुमार विश्वास म्हणाले.
"माझ्यासाठी आनंदाचा किंवा दुःख होण्याचा विषय नाहीये. मी मध्ये उभा आहे. आनंद या गोष्टीचा आहे की, कोट्यवधी लोक आशेला लागले होते, लोक व्यवसाय सोडून आले होते. शत्रूत्व पत्करलं होतं, त्या सगळ्यांची हत्या एका स्वतःच्या प्रेमात बुडालेल्या व्यक्तीने केली", अशी घणाघाती टीका कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवालांवर केली.
अरविंद केजरीवालांचा पराभव
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला. भाजपचे उमेदवार प्रवेश साहिब वर्मा यांनी ३,१८१ इतक्या मताधिक्याने केजरीवालांचा पराभव केला. दिल्ली विधानसभा मतदारसंघातील या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष होते. कारण याच मतदारसंघातून काँग्रेसचे संदीप दीक्षित हेही मैदानात होते.