नवी दिल्ली : जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हय्या कुमार व अन्य काही जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालविण्यास परवानगी दिल्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी हल्लाबोल केला आहे. देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समज कमी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.चिदम्बरम यांनी टष्ट्वीट केले आहे की, देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समज केंद्र सरकारपेक्षा कमी चुकीची नाही. कन्हय्या कुमार आणि अन्य जणांविरुद्ध भादंविच्या कलम १२४ अ आणि १२० ब नुसार खटला चालविण्यास जी परवानगी देण्यात आली आहे ती आपल्याला अमान्य आहे.जेएनयूतील माजी विद्यार्थी नेते कन्हय्या कुमार आणि अन्य दोन जणांविरुद्ध खटला चालविण्यास दिल्ली पोलिसांना दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. २०१६ मधील या प्रकरणात कन्हय्या कुमार याच्यासोबत जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य याच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी यात म्हटले आहे की, आरोपींनी ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयू परिसरात एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणांचे समर्थन केले होते.
"देशद्रोह कायद्याबाबत दिल्ली सरकारची समजही कमी"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:58 AM