Delhi CM First Major Decision: नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी दिल्लीतीलआप सरकारने लाखो कामगारांना भेट दिली आहे. आप सरकारने किमान वेतन दरात वाढ केली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी बुधवारी सांगितले की, अकुशल कामगारांना किमान वेतन आता १८०६६ रुपये प्रति महिना मिळणार आहेत. अर्ध कुशल कामगारांना १९९२९ रुपये किमान वेतन मिळेल. तर कुशल कामगारांना आता दरमहा २१९१७ रुपये मिळणार आहेत. तसेच, दिल्लीच्या तुलनेत भाजपशासित राज्ये किमान वेतनाच्या निम्मे वेतन देतात, असा दावा आतिशी यांनी केला.
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, देशभरातील किमान वेतन बघायला गेले तर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने देशात सर्वाधिक किमान वेतन दिले आहे. गरीब लोकांचे शोषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने किमान वेतन ऐतिहासिक पातळीवर वाढवले आहे. भाजपने नेहमीच गरीब विरोधी काम केले आहे आणि हे आपण दोन प्रकारे पाहू शकतो.
अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने २०१६-१७ मध्ये किमान वेतन वाढवण्याबाबत पहिल्यांदाच चर्चा केली, तेव्हा भाजपने आपल्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून आम्हाला रोखले. त्यानंतर दिल्ली सरकारने न्यायालयाकडून किमान वेतनात वाढ करण्याचा आदेश आणला, असे म्हणत अतिशी यांनी भाजपावर निशाणा साधला.
पुढे आतिशी म्हणाल्या की, भाजपने याला कडाडून विरोध केला होता. नेहमीप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने जोरदार लढा देत दिल्लीतील सामान्य जनतेच्या बाजूने निर्णय आणला. भाजपशासित राज्यांवर नजर टाकली तर तेथील किमान वेतन दिल्लीपेक्षा निम्मे असू शकेल. भाजप आपल्या राज्यांत कमी वेतन तर देतेच पण दिल्लीतही ते रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. आम्ही किमान वेतन वाढवत आहोत.