नवी दिल्लीब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने कहर केल्यानंतर आता दिल्ली सरकार देखील खडबडून जागं झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधी ब्रिटनमधून दिल्लीत आलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या घरी जाऊन आरोग्याची तपासणी करणार असल्याची माहिती दिल्ली सरकारने मंगळवारी दिली.
ब्रिटनहून आज सकाळी आणि सोमवारी रात्री दिल्लीत आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. "ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार सतर्क आहे. संपूर्ण परिस्थितीवर सरकारचं लक्ष असून विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे", असं सत्येंद्र जैन म्हणाले.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास ७ हजार प्रवासी ब्रिटनहून दिल्लीत दाखल झाले आहेत. यातील काही जणांनी पंजाब आणि इतर ठिकाणी प्रवास केला आहे. या सर्वांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जैन यांनी दिली.