नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचार्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विना-आवश्यक सेवांशी (Non-Essential Services) संबंधित 50 टक्के सरकारी कर्मचारी घरातूनच काम (Work From Home) करतील, असा निर्णय दिल्ली सरकारकडून घेण्यात आला आहे.
हा नियम ग्रेड वन आणि वरिष्ठ अधिका-यांना लागू होणार नाहीसरकारी कार्यालयांमध्ये सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करता येईल, यासाठी दिल्ली सरकार असा निर्णय घेत आहे. मात्र, हा नियम ग्रेड वन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागू होणार नाही. तसेच, हा नियम आरोग्य, स्वच्छता, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, होमगार्ड, वीज, पाणीपुरवठा अशा महत्वाच्या सेवांना लागू होणार नाही. एका महिन्यानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्यास सरकार नवीन आदेश जारी करेल.
खासगी कंपन्यांनाही सल्ला या आदेशात खासगी कंपन्यांच्या कार्यालयांनाही 50 टक्के कर्मचार्यांसोबत काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कंपन्यांनी कामाचे तास आणि कर्मचार्यांची संख्या कमी करावी. शक्य असेल तर कर्मचार्यांकडून घरून काम करून घ्यावे, असे या आदेशात म्हटले आहे.
दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत 8,998 जणांचा मृत्यूदिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 5,61,742 वर पोहोचली असून त्यापैकी 5,16,166 लोक बरे झाले आहेत. तर सध्या 36,578 लोक संक्रमित आहेत. शनिवारी दिल्लीतील कंटेन्टेंट झोनची संख्या वाढून 5331 झाली. तसेच, शनिवारी कोरोनाचे 4,998 नवे रुग्ण आढळले. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे 8,998 लोकांचा मृत्यू झाला आहे.