लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एअर इंडियाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धती एकतर्फी, बेकायदेशीर आणि लोकहिताच्या विरुद्ध आहे, असा आरोप करून स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्या. ज्योतीसिंग यांनी हा निर्णय दिला. ‘आम्ही तुमची याचिका फेटाळून लावत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले. याबाबतचे विस्तृत निकालपत्र नंतर अपलोड केले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने ४ जानेवारी रोजी स्वामी यांच्यासह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या याचिकेस केंद्र सरकारने विरोध केला होता. २५ ऑक्टोबर रोजी टाटा सन्ससोबत एअर इंडियासाठी १८ हजार कोटी रुपयांचा खरेदी करार करण्यात आला होता.
सीबीआय चौकशीची याचिकेत मागणीn एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती स्वामी यांनी आपल्या याचिकेत केली होती. n या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली होती.