नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राज्यसभा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी सुब्रहमण्यम स्वामी यांनी केलेली याचिका फेटाळली आहे. सुब्रहमण्यम स्वामी यांनी 6 जुलै रोजी दिल्ली उच्च नायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेतून सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूचा पुन्हा एका सीबीआय तपास केला जावा, आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. जानेवारी २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता.
केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सुब्रहमण्यम स्वामींच्या याचिकेला विरोध करत, तपासावर शशी थरुर यांचा कोणताही प्रभाव नसल्याचं उच्च न्यायालयाला सांगितलं. शशी थरुर यांचा दबाव असल्याने सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा तपास व्यवस्थित केला जात नसल्याचा स्वामींचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. न्यायालयानेदेखील सुब्रहमण्यम स्वामींनी दिलेल्या माहितीवर आक्षेप नोंदवला. सोबतच ही माहिती याआधीच न्यायालयाला द्यायला हवी होती असंही सांगितलं.
उच्च न्यायालयाने सुब्रहमण्यम स्वामींना खडसावलंदेखील आहे. तुमची पीआयएल म्हणजे पॉलिटिकल इंटरेस्ट लिटिगेशन (पीआयएल) असल्याचं न्यायालय सुब्रहमण्यम स्वामींना बोललं आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालात सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचे म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०१५ मध्ये पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचीदेखील मदत घेतली होती. पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही असा अहवाल एफबीआयने दिला होता. पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार मेहेर तरार यांचीदेखील कसून चौकशी केली होती.