Wife Taunting and HC Observation: दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी देताना एक मोठी टिप्पणी केली आहे. पत्नीने पतीच्या कमाईबद्दल सतत टोमणे मारले आणि आर्थिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला तर ही मानसिक क्रूरता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जर एखाद्या पत्नीने असे केले तर पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कोणीही त्यांच्या जोडीदाराला त्याच्या आर्थिक मर्यादांची सतत आठवण करून देऊ नये. अवास्तव मागण्यांमुळे माणूस खचतो, ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, पत्नीने कोणत्याही परिस्थितीत अवास्तव खर्चासाठी पतीकडे आग्रह धरू नये असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सुरेश आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, पत्नीने तिच्या पतीला आर्थिक मर्यादांची सतत आठवण करून देऊ नये. जर पत्नीने तिच्या जोडीदारावर आर्थिक आवाक्यात नसलेली मोठी आणि काल्पनिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दबाव आणला तर तो मानसिक तणावाखाली येऊ शकतो. यामुळे दोघांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होईल, ज्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून लोकांनी गरज आणि इच्छा यातील अंतर जाणून घ्यायला हवे.
खरं तर क्रूरतेच्या कारणास्तव पत्नीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पत्नीच्या याचिकेवर दिल्लीउच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती, जी खंडपीठाने फेटाळली आहे. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने विचार केला, ज्यामध्ये पत्नीची कृत्ये, घर बदलण्यास भाग पाडणे, कर्ज घेण्याबद्दल टोमणे मारणे आणि आर्थिक समस्येवरून टोमणे मारणे तसेच आहे त्या आर्थिक परिस्थितीत जुळवून घेण्यास नकार देणे या गोष्टी मानसिक क्रूरतेच्या मानल्या गेल्या.
पतीचे गंभीर आरोपयाचिकाकर्त्या पतीने केलेल्या आरोपानुसार, पत्नीने त्याला हरयाणातून दिल्लीत येण्यास भाग पाडले, वेगळे घर खरेदी केले आणि आई-वडिलांकडून ८००० रुपयांचे कर्ज घेतले म्हणून सतत टोमणे मारले. तसेच पत्नीने दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आणि सांगितले की ती मोठ्या आलिशान घरात राहण्याचे स्वप्न पाहते. परंतु, तिने उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांशी जुळवून घेण्यास नकार दिला.
न्यायालयाने सांगितले की, जोडीदाराच्या आर्थिक आवाक्यात नसलेली दूरची आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जोडीदारावर दबाव आणल्याने सतत असंतोषाची भावना निर्माण होते. यामुळे वैवाहिक जीवनातील समाधान कमी होऊ शकते. दोघांमध्ये ताण वाढू शकतो. सततची भांडणे याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन न्यायालयाने म्हटले की, क्षुल्लक वाटणाऱ्या घटना कालांतराने आणखी मोठ्या झाल्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. यामुळे नात्यात दुरावा येतो.
हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ (1A) चा हवाला देत न्यायालयाने म्हटले आहे की, या कलमांतर्गत वैवाहिक हक्कांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल घटस्फोट देणे हा कोणत्याही पक्षाचा पूर्ण अधिकार आहे.