Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:38 PM2021-06-18T20:38:27+5:302021-06-18T20:42:48+5:30
Coronavirus: दिल्लीत कोरोना नियमांचे पालन होत नसल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली आहे.
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले आहे. तर, दुसरीकडे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. देशातील विविध न्यायालयांमध्ये अद्यापही कोरोनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीउच्च न्यायालयाने स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली असून, या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच कोरोना नियमांवरून ताशेरेही ओढले आहेत. (delhi high court issued notice to centre and delhi govt over corona situation)
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अनेक सामान्य नागरिकांकडून मास्क न लावल्याचे आढळून आल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने स्यू मोटो दाखल करून घेत याप्रकरणी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. दिल्लीत कोरोनाच्या कोणत्याच नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इंधनदरवाढीवर नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय; लीटरमागे २० रुपयांची बचत शक्य!
कोरोनाची तिसरी लाट जास्त दूर नाही
कोरोनाची लाट आता अधिक दूर नाही, अशी टिपण्णी न्यायालयाने यावेळी केली. एम्सच्या एका डॉक्टरांनी दिल्ली उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींना काही फोटोज पाठवले. यामध्ये दिल्लीतील सार्वजनिक स्थळांवर कोरोनाचे नियम पाळले जात नसून, बहुतांश लोकांनी मास्क लावले नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली.
“कृषी कायद्यावरील चर्चेसाठी केव्हाही तयार, स्वागत आहे”: नरेंद्र सिंग तोमर
नागरिकांमध्ये जागरूकता यायला हवी
या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला कोरोनाच्या नियमांबाबत सर्व बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये जागरूकता तसेच संवेदनशीलता आणावी, असे म्हटले आहे. आठवडी बाजारात गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत गोष्टी सुनिश्चित कराव्यात, असे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले. तसेच कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांमध्ये चूक होता कामा नये. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक विक्राळ रुप धारण करू शकते, असा इशारा उच्च न्यायालायने दिला. या याचिकेवरील पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे.