नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग गुरू स्वामी रामदेव यांना अॅलोपॅथीवर केलेल्या वक्तव्यामुळे नोटीस बजावली आहे. स्वामी रामदेव यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या पद्धतीवरून डॉक्टरांवर टीका केली होती. यामुळे आता उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना अॅलोपॅथी आणि अॅलोपॅथिक डॉक्टरांविरोधात "चुकीची माहिती पसरवल्या"बद्दल नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 10 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Delhi high court issued notice on swami ramdev statement lakhs died due to allopathy medicine)
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तक्रारीनंतर पाटणा आणि जयपूर येथे स्वामी रामदेवांविरोधात अनेक एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.
यानंतर, आपल्या वक्तव्याचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वामी रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोरोना व्हायरस संक्रमणावरीर उपचारात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांवर प्रश्न उपस्थित केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत बाबा रामदेव, "कोविड-19 साठी अॅलोपॅथिक औषधी घेतल्यानंतर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे," असे म्हणताना ऐकू येत आहे.
पतंजलीच्या आयपीओबाबत बाबा रामदेव यांनी केली मोठी घोषणा, गुंतवणुकदारांमध्ये उत्सुकता
रामदेवांच्या या वक्तव्यावर डॉक्टरांच्या एका संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही, रामदेवांचे हे वक्तव्य "अत्यंत दुर्दैवी" असल्याचे म्हणत, ते वापस घ्यायला सांगितले होते.
आयएमएची नोटीस -तत्पूर्वी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने मे महिन्यात बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली होती. यात, बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. याच बरोबर रामदेव यांना 72 तासांच्या आत कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरातही सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगण्यात आले होते. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सवर प्रभावी असल्याचा दावा, या जाहिरातीत करण्यात आला होता.