नवी दिल्ली : योग गुरु बाबा रामदेव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी समन्स बजावले. बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथिक औषधांविरोधात केलेली कथित विधाने आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोविड-१९ बरा होतो, या केलेल्या दाव्यावरून त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर ही नोटीस दिली गेली आहे.न्यायालयाने बाबा रामदेव यांना कोणतीही बंधने घालण्यास नकार दिला. न्यायालयाचे म्हणणे असे होते की ॲलोपॅथिक शाखा ही काही इतकी नाजूक नाही.बाबा रामदेव यांनी कोणतीही प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत, असे त्यांना सांगा, असे न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांनी त्यांचे वकील राजीव नायर यांना तोंडी सांगितले. दिल्ली मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावून आपले म्हणणे तीन आठवड्यात सादर करण्यास सांगितले. यावर आता १३ जुलै रोजी सुनावणी होईल. खंडपीठाने ट्विटर आणि फेसबुक ही समाजमाध्यमे आणि आस्था वाहिनीलाही समन्स बजावले आहे. ही तर दिशाभूल : कोरोना विषाणूला काेरोनिल औषध बरे करीत नाही, त्यामुळे बाबा रामदेव यांचे विधान दिशाभूल करणारे आहे, असे डीएमएने आपल्या सदस्य डॉक्टरांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले. बाबा रामदेव यांच्या विधानांनी डीएमएवर कसा परिणाम केला, असे न्यायालयाने विचारल्यावर डीएमएचे वकील राजीव दत्ता म्हणाले,“त्या औषधाने कोरोना विषाणू बरा होत नाही आणि ही याचिका डॉक्टरांच्या नागरी हक्कांसाठी आहे.”
बाबा रामदेव यांना उच्च न्यायालयाचे समन्स; ३ आठवड्यांत उत्तर द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 6:59 AM