आम्ही सरकारला सांगून विकिपीडिया बंद करायला लावू; हायकोर्टाची तीव्र नाराजी, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:57 PM2024-09-05T14:57:58+5:302024-09-05T14:58:40+5:30
Delhi High Court on Wikipedia : दिल्ली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला अवमानाची नोटीस बजावली आहे.
Delhi High Court on Wikipedia : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी(दि.5) विकिपीडियाला (Wikipedia) अवमानाची नोटीस बजावली आहे. ANI या वृत्तसंस्थेने विकिपीडियावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. विकिपीडियाने आपल्या पेजवर एएनआयचा उल्लेख सरकारचा 'प्रचारक' म्हणून केल्याचा आरोप आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नवीन चावला यांनी विकिपीडियावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, "तुम्हाला भारत आवडत नसेल, तर कृपया भारतात काम करू नका. आम्ही सरकारला विकिपीडिया भारतात ब्लॉक करण्यास सांगू."
आज कोर्टात काय झालं?
सुनावणीदरम्यान न्यायालयाने आदेशाचे पालन का केले नाही? अशी विचारणा केली. न्यायालयाने यापूर्वीच विकिपीडियाला एएनआयच्या पेजमध्ये बदल करणाऱ्यांची नावे विचारण्यात आली होती. पण, अद्याप ही नावे समोर आलेली नाहीत. यावर विकिपीडियाच्या वकिलाने सांगितले की, संस्थेचे बेस भारतात नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्यास वेळ लागेल.
"If you don't like India, please don't work in India... We will ask government to block Wikipedia in India."
— Bar and Bench (@barandbench) September 5, 2024
Delhi High Court issues contempt of court notice to Wikipedia for not complying with the Court's order directing it to disclose info about people who made edits on ANI's… pic.twitter.com/fB3SFjN3pO
त्यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने अवमानाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. कोर्टाने म्हटले की, विकिपीडियाचा बेस भारतात आहे की नाही हा प्रश्न नाही, तर न्यायालयाच्या आदेशाचे पालन का झाले नाही, हे महत्त्वाचा आहे. आम्ही सरकारला सांगून भारतात तुमचे काम बंद करू, तुमचे व्यावसायिक व्यवहार बंद करू, असा इशाराही न्यायालयाने दिला. आता या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
काय प्रकरण आहे?
काही अज्ञात लोकांनी विकिपीडियावरील एएनआयच्या पेजमध्ये आक्षेपार्ह माहिती टाकली होती. एएनआय सरकारच्या प्रचाराचे साधन आहे, असा बदल त्यात केला होता. यानंतर एएनआयने तक्रार दाखल केली. न्यायालयाने विकिपीडियाला पेज एडीट करणाऱ्या लोकांची माहिती देण्याचे आदेश दिले होते, परंतु विकिपीडियाने आदेशाचे पालन केले नाही, यामुळे एएनआय पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचे सांगितले.