Manish Sisodia Delhi Liquor Scam: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दिल्लीउच्च न्यायालयाकडून जोरदार झटका बसला आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनिष सिसोदियाच मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. मनिष सिसोदिया यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या ३४ पानी निकालात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मनिष सिसोदिया असून, त्यांना सुमारे ९० ते १०० कोटी रुपये लाच म्हणून देण्यात येणार होते, असा दावा सीबीआयने केला होता. तसेच या मद्य घोटळ्यात मनिष सिसोदिया यांचा सक्रीय सहभाग होता, असे निरीक्षण न्यायालायाने नोंदवले आहे. विशेष न्या. एम. के. नागपाल यांनी मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. १७ एप्रिलपर्यंत मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढण्यात आली आहे.
सीबीआयला योग्य वाटल्यावरच सिसोदिया यांना अटक केली
विशेष न्या. एम.के.नागपाल यांनी म्हटले आहे की, सर्व पुरावे मनिष सिसोदिया यांच्याविरोधात आहेत. मनिष सिसोदिया भ्रष्टाचारात सामील होते, हेच या पुराव्यांवरून सूचित होते. सिसोदिया यांना अटक करून सीबीआयने कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच या प्रकरणी कोणत्याही आदेशाची अवहेलना केलेली नाही. न्यायालयाचा अवमानही केलेला नाही. सीबीआयसला जेव्हा आवश्यक वाटले, तेव्हाच त्यांनी सिसोदिया यांना अटक केली, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मोजक्या ब्रॅण्ड्सना फायदा करून देण्याचा सिसोदियांचा प्रयत्न
मनिष सिसोदिया यांनी काही मोजक्या ब्रॅण्ड्सना फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सिसोदिया यांनी सर्व नियम डावलले. दक्षिणेतील लॉबीशी असलेला संबंध हा या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. या मद्य घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. याचा प्रभाव अनेकांवर पडणार आहे. याचा विचार सिसोदिया यांनी केला नाही. तसेच यामुळे सामान्य माणसांवर मोठा परिणाम होऊ शकतो, ही बाबही विचारात घेतली नाही, असे न्यायालायने म्हटल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज मंजूर करता येणार नाही. सिसोदिया यांना जामीन मंजूर केल्यास बाहेर पडल्यावर या प्रकरणाशी संबंधित गोष्टींमध्ये ते छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतात. महत्त्वाच्या बाबींवर प्रभाव पाडू शकतात. अद्यापही मद्य घोटाळ्याचा तपास पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत सिसोदिया यांना सोडणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनिष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"