उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:32 PM2023-03-28T13:32:17+5:302023-03-28T13:33:20+5:30

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे.

Delhi High Court Summons Against Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut | उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

googlenewsNext

नवी दिल्ली - शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टाने तिघांना समन्स बजावले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने तिघांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

काय आहे प्रकरण? 
खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ही याचिका दिल्ली हायकोर्टाने दाखल करून घेत तिन्ही नेत्यांना प्रत्यक्ष कोर्टात आवश्यक ती कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत समन्स जारी केला आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदार, १३ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या आमदार-खासदारांवर आक्रमक टीका करत आहेत. अनेक ठिकाणी खोके उल्लेख करून डिवचण्यात येते. आजही सोशल मीडियावर शिंदे गटातील आमदार,खासदारांवर केलेली विधाने आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही नोटीस काढली आहे. या पोस्ट का हटवण्यात आल्या नाहीत असा खुलासा कोर्टाने मागितला आहे. 

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीत मानहानीच्या दाव्याची याचिका दाखल करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्याकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात ठाकरेंकडून केलेले बदनामीकारक विधाने सादर केली. या विधानाचे गांभीर्य ओळखून कोर्टाने ही याचिका स्वीकारली. न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मनाई आदेश काढू नयेत यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमचे जे काही म्हणणे असेल ते लेखी दाखल करा असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे. 

Web Title: Delhi High Court Summons Against Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.