नवी दिल्ली : येथील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात तीन यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. लोकांना तपासावर कोणतीही शंका राहू नये, हे सुनिश्चित करण्यासाठी हे निर्देश दिल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच तुम्ही तळघरात शिरलेल्या पाण्याला दंड लावला नाही, हे सुदैवच आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने दिल्ली पाेलिसांवर ताशेरेही ओढले.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) फौजदारी खटल्यातील सीबीआयच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगितले. न्यायालयाने बुडण्याच्या घटनेबद्दल पोलिस आणि दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) यांना फटकारले आणि सांगितले की, विद्यार्थी बाहेर कसे येऊ शकले नाहीत, हे समजू शकले नाही.
दिल्ली महानगरपालिकेने विविध भागांत बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या २५ तळघरांना गेल्या ४ दिवसांमध्ये सील ठोकले आहे.