नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात असलेल्या इस्रायल दूतावासाच्या पाठीमागे स्फोट झाल्याची माहिती मिळाल्याने खळबळ माजली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभाग व पोलिसांनी तासभर परिसरात तपास केला, मात्र कुठलीही धोकादायक वस्तू किंवा स्फोटाची आढळून आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका व्यक्तीने अग्निशमन दलाला संध्याकाळी 5.47 वाजता फोन करुन राजधानीत असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे स्फोट झाल्याची माहिती दिली. यानंतर दिल्ली पोलिसांना सतर्क करण्यात आले. दूतावासाच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडात हा स्फोट झाल्याचे त्या व्यक्तीने फोनवर सांगितले. यानंत पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली.
पोलिसांच्या पथकाने त्या संपूर्ण परिसराची तपासणी केली, मात्र त्यांना कुठलीही धोकादायक वस्तू सापडली नाही. आता पोलीस त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, दिल्लीतील इस्रायली दूतावासाचा परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये येतो. इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर दूतावासाच्या आसपास ज्यादा सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.