नवी दिल्ली: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आधी त्यांच्या मागे ED-CBI लागले होते, तर आता त्यांच्या मागे NIA च्या चौकशीचा फेरा लागणार आहे. याचे कारण म्हणजे, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी केजरीवालांवर 'शिख फॉर जस्टिस' या दहशतवादी संघटनेकडून 16 मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी घेतल्याचा आरोप करत NIA चौकशीची शिफारस केली आहे.
व्हीके सक्सेना यांना विश्व हिंदू महासंघाकडून लेखी तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP ने दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी आणि खलिस्तान समर्थक भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी खलिस्तानी गटांकडून 16 मिलियन डॉलर्स घेतल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर व्हीके सक्सेना यांनी NIA तपासाची शिफारस केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.
खलिस्तानी पन्नूच्या व्हिडिओचाही हवाला देण्यात आलातक्रारीत शिख फॉर जस्टिसचा प्रमुख आणि प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने जारी केलेल्या व्हिडिओचा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये त्याने आरोप केला की, AAP ला 2014 ते 2022 दरम्यान खलिस्तानी गटांकडून US $ 16 मिलियन मिळाले आहेत. 2014 मध्ये केजरीवाल यांनी गुरुद्वारा रिचमंड हिल्स, न्यूयॉर्क येथे खलिस्तानी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केल्या, ज्यामध्ये केजरीवालांनी खलिस्तानी गटांकडून आपला भरीव आर्थिक मदत देण्याच्या बदल्यात भुल्लरच्या सुटकेचे आश्वासन दिले होते.
आपने आरोप फेटाळलेएनआयए तपासाच्या शिफारशीवर आम आदमी पक्षाने हा कट असल्याचे म्हटले आहे. नायब राज्यपाल भाजपचे एजंट असल्याचा आरोप दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. सीएम केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मोठे षडयंत्र रचले जात आहे. दिल्लीतील सातही जागा भाजपने गमावल्या आहेत. पराभवाच्या भीतीने भाजप घाबरलाय. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने हा कट रचला होता, अशी टीका आपने केली.
कोण आहे देविंदर पाल सिंग भुल्लर?देविंदर पाल सिंग भुल्लर 1993 च्या दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आहे. दिल्लीतील युवक काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या स्फोटात भुल्लरला दोषी ठरवण्यात आले होते, ज्यात 9 जण ठार आणि 31 जण जखमी झाले होते. जर्मनीतून हद्दपार झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 1995 पासून तिहार तुरुंगात बंद असलेल्या भुल्लरला ऑगस्ट 2001 मध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु 2014 मध्ये त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.