लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: ‘तुमचे आरोप दिशाभूल करणारे, असत्य आणि अपमानास्पद आहेत. मला तुमची भेट घ्यायला आवडली असती आणि तुम्हाला जेवणही दिले असते. पण अत्यंत कमी कालावधीत ७०-८० लोकांसोबत एकाच वेळी बैठक घेणे शक्य झाले नसते आणि त्यातून कोणताही ठोस हेतू साध्य झाला नसता,’ असे खरमरीत पत्र नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहिल्यामुळे दोन सर्वोच्च निर्णयकर्त्यांमधील भांडण शिगेला पोहोचले आहे.
“नायब राज्यपाल कोण आहेत,’ आणि ‘ते कोठून आले’, इत्यादी प्रश्नांची उत्तरे देता येईल, परंतु ते उत्तर देण्यास पात्र नाहीत, कारण ते स्पष्टपणे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत, असे सक्सेना यांनी चार पानांच्या पत्रात म्हटले आहे. सक्सेना यांच्यावर फिनलँडला शिक्षक प्रशिक्षण भेट रोखल्याचा आरोप आहे.
‘केंद्र, दिल्ली सरकारचे स्वतंत्र पोलिस दल तयार करा’
आपच्या आमदारांनी गुरुवारी व्ही. के. सक्सेना आणि भाजपशासित केंद्रावर हल्ला केला. शहरातील कायदा व्यवस्था पाहता ‘आप’ आमदार ऋतुराज यांनी केंद्रासाठी स्वतंत्र “एनडीएमसी पोलिस” दलाची निर्मिती करण्याची सूचना केली ज्याचे अधिकार नवी दिल्ली क्षेत्रापुरते मर्यादित राहतील आणि उर्वरित शहरासाठी दिल्ली सरकारच्या अखत्यारीतील दुसरे दल तयार करावे, अशी मागणी केली.