नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील (Delhi Liquor Policy Case) कथित भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापेमारी सुरू केली आहे. ईडीने मंगळवारी राजधानी दिल्लीसह देशातील 30 ठिकाणी छापे टाकले. आरोपी समीर महेंद्रूच्या दिल्लीतील घरावर छापेमारी सुरू आहे. तसेच गुरुग्राम, लखनौ, हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरू येथेही छापे टाकले जात आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, यूपी, पंजाब, हरियाणा आणि तेलंगणामध्ये ईडीचे छापे टाकले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचले आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला आहे. समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे एमडी आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. दरम्यान, सीबीआयच्या एफआयआरमध्ये ज्यांचे नाव नोंदवले आहे, त्यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत.
ईडीचे कोणतेही पथक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी किंवा कार्यालयात गेलेले नाही. सिसोदिया हे सीबीआय तपास करत असलेल्या अबकारी धोरण प्रकरणात आरोपी आहेत. दरम्यान, ईडीच्या तपासाला उत्तर देताना मनीष सिसोदिया म्हणाले, "पहिल्यांदा सीबीआयने छापा टाकला, त्यांना काहीही सापडले नाही. आता ईडी छापे टाकत आहे, त्यांनाही काही मिळणार नाही. अरविंद केजरीवाल यांच्याकडून सुरू असलेले चांगले काम रोखण्याचा हा प्रयत्न आहे. सीबीआय, ईडी यांना हवे ते करू द्या. मला काही माहिती नाही, त्यांना फक्त शाळांचे आणखी ब्लूप्रिंट मिळतील."
दुसरीकडे, भाजप नेते मनोज तिवारी यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "मद्य धोरणाबाबत समोर आलेल्या स्टिंग ऑपरेशनने आम आदमी पार्टी, मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना दहशतीच्या शिखरावर आणले आहे. स्टिंग ऑपरेशननंतर सीबीआयच्या प्रतिक्रियेवरून मनीष सिसोदिया यांनी स्वत:लाच गोवले असल्याचे दिसते. मनीष सिसोदिया यांना कोणतीही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे सीबीआयने स्पष्टपणे म्हटले आहे."
सीबीआयने 19 ठिकाणी टाकले होते छापे गेल्या महिन्यात सीबीआयने मनीष सिसोदिया, आयएएस अधिकारी आणि दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर आणि सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्य 19 ठिकाणी छापे टाकले होते. उत्पादन शुल्क विभाग सांभाळणारे मनीष सिसोदिया, माजी उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, माजी उपायुक्त आनंद कुमार तिवारी, सहाय्यक उत्पादन शुल्क आयुक्त पंकज भटनागर, नऊ व्यापारी आणि दोन कंपन्यांची केंद्रीय तपास संस्थेच्या एफआयआरमध्ये नावे आहेत.